क्राईमताज्या घडामोडीदेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसामाजिक

नेहमीचीच वाहनांची तोडफोड आणि दहशत, उपनगर पोलीस दांड्या खेळण्यात व्यस्त आहेत का ? 


उपनगर पोलीस हद्दीला एकदाचं नक्षली हद्द म्हणून घोषित तरी करून टाका 

नाशिकरोड/प्रतिनिधी:- गाड्यांची तोडफोड, जाळपोळ, बेछूट गोळीबार, शस्त्र घेऊन खुलेआम दहशत अशा सततच्या घडणाऱ्या विविध घटनांनी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकांच्या मनात कायमच धडकी भरलेली असते, कधी काय होईल याचा भरोसा नाही. एका बाजूला बिबट्याची दहशत तर दुसऱ्या बाजूला कोयता धारी टवाळखोरांचा मुक्त संचार, बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावले आहेत मात्र शस्त्रधारी दोन पायाच्या ह्या बिबट्यांना पकडण्यासाठी व त्यांची दहशत संपवण्यासाठी उपनगर पोलिसांकडे काही ठोस उपाय उरलाच नाही का ? असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून विचारला जात आहे.

Advertisement

उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धोंगडे नगर व डावखरवाडी परिसरात पहाटे 4.42 वाजे दरम्यान हातात कोयते घेऊन काळया रंगाच्या दुचाकी वर आलेल्या तिघा संशयितांनी दहशत माजवण्यासाठी येथील रहिवाशांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या. या घटनेची माहिती उपनगर पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी घटनास्थळी दाखल होत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात संशयितांना लवकरच पकडण्यात येईल व ठोस उपाय योजना करत कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. ह्या घटनेनंतर शस्त्रधारी टवाळखोरांनी जणूकाही उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस नाही तर आपलाच दबदबा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवल्याचे बोलले जात आहे. त्या उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील एखाद दुसरा अंमलदार सोडला तर बाकी सर्वच आयत्यावर कोयता अशी परिस्थिती आहे. उपनगर गुन्हेशोध पथकाचे प्रमुख नेमकी कुठल्या कामात व्यस्त असतात असा प्रश्न घडणाऱ्या घटनांवरून उपस्थित होतो. नवरात्रीचे दिवस संपून दसरा उजाडला मात्र उपनगर पोलीस अजूनही दांड्या खेळण्यातच व्यस्त आहेत का ? अशा प्रतिक्रिया या घटनेनंतर नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत. भयमुक्त उपनगर हद्द ही प्रबळ इच्छा वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांची एकट्याची असून चालणार नाही त्यांना गुन्हे शोध पथकाची साथ आवश्यक जी दुर्दैवाने कमी किंवा अगदीच दिसत नाही. एक से बढकर एक दहशत निर्माण करणारे गुन्हेगार उपनगर हद्दीमध्ये आहेत पण त्यांचा माज मोडणारे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, निलेश माईनकर व त्यांच्या टीम सारखे पुन्हा उपनगर पोलीस ठाण्याच्या नशिबी लाभतील का ? शहराचे तत्कालीन आयुक्त कुलवंत कुमार सरंगल व उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी पोलीस खात्यातील ह्या अधिकाऱ्यांची आजही नाशिककर आठवण काढतात आणि आजच्या परिस्थितीवर हळहळ व्यक्त करतात व ह्या अधिकाऱ्यांप्रमाणे गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी झिरो टॉलरेन्स कागदावर नाही तर प्रत्येक पोलिसाच्या कमरेवरच्या बंदुकीवर व हातातील दांडुक्यावर लिहिले पाहिजे अशी मागणी होत आहे. येथील गुन्हेगारी आणि भय संपत नसेल तर उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीला एकदाचं नक्षली हद्द म्हणून तरी घोषित करून टाका म्हणजे येथील नागरिक पोलिसांकडून जास्त काही अपेक्षा तरी ठेवणार नाही.

गुन्ह्याची तीव्रता बघा गुन्हेगाराचे वय नाही त्याप्रमाणेच शिक्षा व्हावी- विक्रम कदम (सामाजिक कार्यकर्ता) 

सर्वसामान्य माणूस जीव मुठीत घेऊन जगत आहे, हद्दीत एका बाजूला बिबट्याची दहशत तर दुसऱ्या बाजूला गुन्हेगारांची. गुन्ह्याचं स्वरूप आणि तीव्रता बघावी गुन्हा करणाऱ्याचं नाही कारण बहुतांश गुन्हेगार 15 ते 19 वयोगटातले त्यांना त्याप्रमाणेच पोलिसांनी ठोकून काढले पाहिजे. तत्कालीन आयुक्त सरंगल व उपायुक्त स्वामी यांच्या कार्यपद्धतीचाच अवलंब आजच्या पोलिस अधिकाऱ्यांनी करावा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!