गुड शॉट- अखेर नाशिकचे भाई बोललेच नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला
गुड शॉट- अखेर नाशिकचे भाई बोललेच नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला
नाशिकरोड तसेच नाशिक न्यायालय व कारागृह परिसरात भाई समर्थकांवर दांडा थेरीपी वापरावी
नाशिक/प्रतिनिधी:- नऊ महिन्यात झालेल्या 46 खुनांच्या व विविध गंभीर स्वरूपाच्या घटनांमुळे नाशिक जिल्हा गुन्हेगारांचा बालेकिल्ला असे थेट गुन्हेगारांकडून बोलले जात होते ज्यामुळे नाशिकमध्ये खरंच पोलिसांचे नव्हे तर गुन्हेगारांचे वर्चस्व आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण नाशिककर भीतीच्या सावटाखाली जगत असतानाच विविध माध्यम व सामाजिक संघटनांकडून नाशिक शहरातील गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात होती. शहरातली वाढती गुन्हेगारी पाहता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अखेर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे एकापाठोपाठ केलेल्या धडाकेबाज कारवाईतून शहरवासीयांना दाखवून दिले. शहरात घडलेल्या विविध गुन्ह्यातील आरोपींच्या मुस्क्या आवळत शहर पोलिसांनी दांडा थेरपीचा वापर केल्याने अखेर नाशिकच्या कथित भाई लोकांना नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे म्हणावे व मान्य करावेच लागले. शहरवासीयांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक करत स्वागत केले आहे तर अशा कारवाया निरंतर चालू ठेवण्याची पोलिसांना आर्तसाद घातली आहे. शहरातले अवैध धंदे बंद करत मद्यपी व टवाळखोरांवर शहर पोलिसांनी दांडा थेरपीचा वापर केला याचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. एका बाजूला शहरातील गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्याचे काम सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला गुन्हेगारांचे वास्तव्य असलेले अड्डे देखील बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आले आहे.
विविध गंभीर गुन्ह्यातले कारागृहात असलेले भाईलोक आपली संपूर्ण यंत्रणा गुन्ह्याच्या सुनावणीसाठी तारखेसाठी आल्यावर न्यायालय परिसरातून चालवत असल्याचे देखील निरीक्षण नोंदवण्यात आले असून, या ठिकाणाहूनच भाई लोकांना भेटण्यासाठी आलेले त्यांचे समर्थक यांना भाई कडून सूचना केल्या जातात व बाहेर मोकाट असलेले भाई समर्थक भाईच्या आदेशाचे पालन करत शहरात गुंडगिरी वाढीस नेतात यांचा बंदोबस्त देखील शहर पोलिसांनी करावा. नियमित नाशिकरोड, नाशिक न्यायालय व कारागृह परिसरात पोलिसांनी मोहीम राबवल्यास अर्ध्याच्या वर गुन्हेगारी संपुष्टात येईल यावर देखील शहर पोलिसांनी लक्ष केंद्रित करावे म्हणजेच खऱ्या अर्थाने नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे हे पूर्णतः सिद्ध करता येईल.
विविध गंभीर गुन्ह्यातले फरार आरोपी यांनी स्वतःहून पोलिसांना शरण यावे व कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे व यापुढे पुन्हा गुन्हा करणार नाही अशी गाठ मनाशी बांधावी अन्यथा फरार आरोपीचे एन्काऊंटर देखील केले जाऊ शकते अशा चर्चा शहरातील क्राइम वर्ल्ड मध्ये सध्या रंगू लागली आहे, याबाबत मात्र पोलिसांकडून कुठलाही दुजोरा मिळालेला नाही.



