सोन्याच्या नेकलेस सह चोरट्यास नाशिकरोड पोलिसांनी घेतले ताब्यात
पो.हवा. विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
नाशिकरोड/प्रतिनिधी:- नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवी चौक परिसरातून 11 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस अज्ञात चोरट्याने चोरी केल्या बाबत रिजवान इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना अज्ञात चोरट्याला शोधण्याचे आव्हान नाशिकरोड पोलिसांसमोर होते. सदर गुन्ह्यातील संशयित चोरीचा नेकलेस घेऊन विक्री करण्यासाठी राजराजेश्वरी मंगल कार्यालय परिसराच्या आसपास फिरत असल्याची गोपनीय माहिती नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील यांना मिळाली असता सदर ठिकाणी गुन्हे शोध पथकाने सापळा रचत संशयित चोर अक्षय मोतीराम शेजवळ वय 28 वर्ष रा. श्रमिकनगर झोपडपट्टी, जेलरोड, नाशिकरोड यास पाठलाग करून ताब्यात घेतले असता त्याच्या अंग झडतीत त्याच्याकडून एक लाख तीस हजार रुपये किमतीचे 11 ग्राम वजनाचे चोरलेले सोन्याचे नेकलेस हस्तगत करण्यात नाशिक रोड गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील करत असून अटक केलेल्या चोरट्याकडून चोरीचे अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विशाल पाटील, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, सागर आडणे, योगेश रानडे, संध्या कांबळे, सुप्रिया विघे यांच्या पथकाने पार पाडली आहे.



