शहरात वाढती दुचाकी चोरी, फिल्डवर उतरत नाशिकरोडचे निरीक्षक सपकाळेंनी पकडला दुचाकी चोर
नाशिकरोड/प्रतिनिधी:- एका बाजूला शहरात शरीराविरुद्धचे व लुटमारीच्या गुन्हेगारी घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे दाखल गुन्ह्यांच्या आकडेवारीतून स्पष्ट दिसत असताना शहरात रोजच दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. काही पोलीस ठाणे वगळता गुन्हे शाखेकडून बऱ्यापैकी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करत आहेत मात्र काही पोलीस ठाण्यांचे प्रभारी खुर्च्या गरम करण्यातच व्यस्त अशा परिस्थितीत पोलीस ठाण्यातील खुर्चीवर कमी आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी हद्दीतील प्रत्येक सेक्शनमध्ये वैयक्तिक लक्ष देणारे नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना दि- 17/9/2025 रोजी शिंदेगाव, शिवाजी चौक येथून सुनील बोराडे यांची हिरो होंडा कंपनीची काळया रंगाची स्प्लेंडर दुचाकी चोरी करणारा इसम चोरीच्या दुचाकीसह सिन्नर फाटा या ठिकाणी येणार असल्याची गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्याने स्वतः गुन्हे शोध पथकासह सदर ठिकाणी सापळा रचून चोरीच्या दुचाकीसह चोरट्यास ताब्यात घेतले. सदर चोरट्यास नाव विचारले असता त्यानी त्याचे नाव गोकुळ संजय देवरे वय 26 वर्ष असे सांगितले त्याच्याकडे पोलिसी कौशल्य वापरून अधिक विचारपूस केली असता गोकुळ देवरे या चोरट्याने म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून देखील एक बजाज कंपनीची प्लेटिना गाडी चोरल्याची कबुली दिली. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ह्या संशयिताकडून च्या दोन दुचाकी हस्तगत करत गुन्ह्यांची उकल केली आहे.
सदरची कामगिरी नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विशाल पाटील, महिंद्रा जाधव, सागर आडणे, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे यांनी केली आहे.
कर्तव्याला समर्पित सहकाऱ्यांसोबत काम करताना यश नक्कीच मिळते- (जितेंद्र सपकाळे- व.पो.नि नाशिकरोड पोलीस ठाणे)
खुर्चीत अडकून बसणारा अधिकारी हद्दीत गुन्हेगारी नियंत्रणात आणू शकत नाही. समर्पित भावनेने काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केल्यास विश्वास आणि यश नक्कीच प्राप्त होते.



