सुरगाणा शहर बंदची हाक
सुरगाणा/प्रतिनिधी:- सुरगाणा नगरपंचायत हद्दीतील मंदिरांच्या बांधकामाबाबत चुकीची व दिशाभूल करणारी बातमी प्रसारित झाल्यामुळे सुरगाणा शहरातील ग्रामस्थ व भक्तवर्गांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
नगरपंचायतीच्या नगरोथान निधीतून हनुमान मंदिरासमोरील सभामंडपाचे बांधकाम तसेच दुर्गादेवी मंदिर व स्वामी समर्थ मठ येथील कामे सुरू असून संबंधित कामे पारदर्शकपणे केली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सारची महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर “कामे निकृष्ट दर्जाची असून इस्टीमेटनुसार होत नाहीत” अशी बातमी प्रसारित करण्यात आली.
ही बातमी कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय व तथ्यांवर आधारित नसल्याने ती भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवणारी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. देवस्थान समिती, नगरपंचायत अधिकारी व हनुमान भक्तांच्या परिश्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही बातमी असल्याने शहरवासीयांत तीव्र रोष निर्माण झाला आहे.
याबाबत ग्रामस्थांनी तहसीलदार सुरगाणा यांना निवेदन देऊन –
1. संबंधित पत्रकार व सहकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी,
2. चुकीची बातमी प्रसारित करून असंतोष निर्माण करणाऱ्यांवर योग्य ती शिक्षा व्हावी,
3. प्रशासनाने सर्व मंदिरांच्या बांधकामांवर लक्ष ठेवून पारदर्शकतेने काम सुरू ठेवावे,
अशा मागण्या केल्या आहेत.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, या निषेधाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी सुरगाणा शहर बंद ठेवण्यात येईल. बंददरम्यान होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील, असेही नमूद करण्यात आले आहे.



