शोलेची पन्नास वर्षे: आभाळंच मग ये आकारा….- जयंत नाईकनवरे (आयपीएस सेवानिवृत्त)
शालेय जीवनातला खडतर प्रवास प्रचंड मेहनत, छोटा मोठा कामधंदा करून आपली उपजीविका व शिक्षण यासाठी कष्ट करणारा व्यक्ती ज्या वेळेला आयपीएस अधिकारी म्हणून निवडला जातो त्या उच्च पदासोबतच अनेक जबाबदाऱ्या देखील येतात. खाकी वर्दीतला अधिकारी आपल्या सेवाकाळात महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य असलेल्या सदरक्षणाय खलनिग्रहण आहे याप्रमाणे प्रामाणिक कर्तव्य बजावतो. या दरम्यान स्वतःसाठी कमी मात्र समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्यासाठी स्वतःला जबाबदार मानत कर्तव्याशी कटिबद्ध राहणारा न्यायप्रिय माणूस सेवानिवृत्तीनंतर देखील आपल्यातला कलात्मक व प्रसंगाला किंवा घटनेला न्याय देण्याचे संपूर्ण प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे उदाहरण जयंत नाईकनवरे सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वलिखित अध्ययनावरून स्पष्ट होते. नाशिक शहर आयुक्त असताना अनेक वेळेला त्यांच्याशी बातमीच्या निमित्ताने संपर्क आला. पूर्वीची गुन्हेगारी आणि आत्ताच्या आधुनिक काळातली गुन्हेगारी यावर सखोल अभ्यासपूर्ण भाष्य ऐकायला मिळत असे, ते अनेक किस्से आणि घटना कथन करत असताना अगदी डोळ्यासमोर ते दृश्य उभे करण्याचे कसब जयंत नाईकनवरे यांच्या संवादात अनेकदा अनुभवली आहेत. गुन्हेगार सुधार मिळाव्या बाबतची संकल्पना ऐकून तोंड भरून त्यांनी केलेलं कौतुक आजही आठवते. पोलीस आणि पत्रकार यांनी खरंच गुन्हेगारांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी दत्तक घ्यायलाच हवे ह्या मानसिकतेचे जयंत नाईकनवरे. केवळ दंड आणि शिक्षा नव्हे तर सुधारणा आणि पुनर्वसन यावर त्यांचा अधिक विश्वास, कायदा व सुव्यवस्था याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन आणि कार्यकाळ सर्वांनाच ठाऊक असेल परंतु कला विश्वातील एखाद्या चित्रपटाबाबत देखील त्यांनी केलेले सखोल लेखन वाचकांच्या मनात त्यांचे एक वेगळे स्थान निश्चितच निर्माण करत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीचा अवलंब आजच्या अधिकाऱ्यांनी देखील करायला हवा त्याचा निश्चितच फायदा होईल. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या शोले चित्रपटाबाबत त्यांनी नोंदवलेले निरीक्षण त्यांच्याच शब्दात.
कोणतीही कलाकृती तयार होत असताना ती अतुलिनय आणि बेजोडंच होईल याबद्दल कुणीही खात्री देऊ शकत नाही. चित्रपटांच्या यशाच्या बाबतीत तर ही अनिश्चितता नेहमीचीच असते. शोले या हिंदी चित्रपटाने नुसतं यशंचं प्राप्त केलं नाही तर जनसामान्यांच्या ह्रदयात सैन्यदलातला फिल्ड माशर्ल मिळवतो त्यासारखी कायमस्वरुपी जागा मिळवली.
देवानं माती, पाणी, उजेड, वारा हा पसारा मिसळून सृष्टी तयार करावी तसंच काही शोले या चित्रपटाबाबत झालं असावं. पहिल्या फळीत संजीवकुमार, धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखे त्यावेळचे प्रसिध्द अभिनेते; हेमामालिनी व जया भादूरी यांच्या सारख्या आघाडीच्या अभिनेत्री, रमेश सिप्पींसारखा दिग्दशर्क, राहुल देव बर्मन सारखा संगीतकार आणि के. आसिफ यांच्यानंतर सढळ हाताने कोट्यावधींची गुंतवणूक करणारा जी.पी. सिप्पीं सारखा निर्माता होता. दुसर्या फळीत इफ्तेकार, सत्येन कप्पू, असरानी, जगदीप, मॅकमोहन, विजू खोटे, सचिन, ए.के.हंगल, लीला मिश्रा, हेलन, जलाल आगा, केश्तो मुखर्जी या कलाकारांनी नुसती धमाल उडवून दिली.
सामान्यतः लोक नायकांना (प्रोटॅगाॅनिस्ट) पाठिंबा (रूट) देतात. मेरा गाव मेरा देश नंतर व्हिलन (ॲंटॅगोनिस्ट) च्या अभिनयाला सुद्धा तितकीच दाद दिली जावू शकते यावर अमजदखानने शिक्कामोतर्ब केलं. त्याला संधी देण्याची जोखीम सिप्पी बाप-लेकांनी उचलली जिचं अमजदनं सोनं केलं.
अशा तगड्या कलाकारांच्या सुपीक मातीत सलीम-जावेदच्या तितक्याच दमदार पाश्चिमात्य प्रकारच्या (वेस्टर्न जाॅनर) आणि हिंदुस्थानी चोर विरुध्द डाकू बदला नाट्याचं मिश्रण केलेल्या पटकथेचं पाणी ओतून चांगलं तुडवून मळलं गेलं. ही मु्ख्यत: डाकू -पोलीस यांची ‘अ” कथा- जी डाकूंचा म्होरक्या आणि तडफदार पोलीस अधिकारी हे दोघेही पसर्नली घेतात. या कथानकाला धर्मेंद्र – अमिताभ या सह्रदयी परंतु बुच कॅसीडी – सन डान्स किड सारख्या जोडीचं ‘ब’ कथानक पूरक होतं. विनोदाचा तडका असलेली अनेक लघु ‘क’ कथानकं आणि कारुण्याची झालर असलेलं इमामसाहबांच्या अहमदिमयाँचं सन्नाटा पसरवणारं अपहरण-हत्या नाट्य हे ‘ड’ कथानक होतं. प्रजासत्ताकदिनी आकाशात उड्डाणं भरुन टकराव न करता कसरती करणार्या लढाऊ विमानांप्रमाणे ही अ, ब, क, ड कथानकं सतत बदलणार्या वेगवेगळ्या करतबी (फाॅमेर्शन्स) करतात ज्या प्रेक्षक श्वास रोखून पहातंच राहतात.
या सर्वांना प्रकाशमय करण्यासाठी दिग्दशर्क रमेश सिप्पी यांची मेहनत अलौकिकंच! त्याने सुग्रीव- वालीच्या देशात, आफ्रिकेतल्या हत्तींसदृश्य रामदेवरा बेट्टा चट्टानाच्या अवतीभवती, राम येडेकर या कला दिग्दर्शकाकडून, अख्खं रामगढ गाव वसवून घेतलं. त्यानंतर एकेका पात्राला जणू समोर बसवून प्रत्येकाच्या कानात मंत्र म्हणून
प्राणप्रतिष्ठापणा केली. त्यांच्या १९७५च्या पानिपतच्या चौथ्या लढाईसाठी पायदळ, घोडदळ आणि तोफखान्यात नेमणूका करुन बाजारबुणग्यांचीही भरती करायला विसरले नाहीत. पात्रांची मांदियाळी असली तरी गर्दी वाटली नाही. मुरलेल्या कलाकारांसोबत अमजद खान सारखे नवखे होतेच. एक- एक संवाद वाट्याला आलेले मॅकमोहन आणि विजू खोटे सारखे अभिनेतेही सवर्तोमुखी झाले. दोन परस्परविरोधी व्यक्तिमत्वाच्या नायीका – एकीचा टिपीकल रोमान्स तर दुसरीचं अबोल प्लॅटॅानिक प्रेम रमेश सिप्पींनी संवेदनशीलतेने शूट केलं.
राहुल देव बर्मननी संगीतरुपी वारा घालून वेळोवेळी या ज्वाळा भडकत राहतील याची दक्षता घेतली. शोलेची सिग्नेचर ट्यून इतकी प्रिसध्द झाली की पुढे त्या ट्यूनवर राजू चले राजू हे गाणं आलं. चित्रपटातल्या महत्वाच्या सिन्सना अधिक उठावदार करण्यासाठी पार्श्वसंगिताची रचना करताना राहुल देव बर्मन यांनी अनोखे आवाज निमार्ण करण्यासाठी केलेले विविध प्रयोग या कलाकृतीला चार चांद लावून गेले.
ज्याला चित्रपटाबद्दल काहीही माहिती नाही अशा प्रेक्षकाला रिकाम्या थिएटरमध्ये एकट्याला बसवून शोले दाखवला तर त्याला ६ ते ७ रिश्टर स्केलचे, इमोशनल भूकंपांचे धक्के, सुरूवातीपासून शेवटपर्यंत बसतंच राहतील आणि शेवटी सावरण्यासाठी तोंडावर पाणी मारावं लागेल इतके भू-सुरुं ग सिनेमात ठासून भरलेले होते.
व्यावसायीक वैर वैयक्तिक पातळीवर आणले गेल्याने होणारे सूड नाट्य ही मध्यवर्ती कल्पना असली तरी सूडाच्या बरोबर मैत्री, त्याग ह्या कथावस्तू (थीम) सुध्दा महत्वाच्या होत्या. कधी समांतर चालणार्या व कधी मुख्य संकल्पनांचा भाग होऊन येणार्या ‘क’ व ‘ड’ उपकथा पेरलेल्या होत्या आणि जागोजागी खुमासदार विनोदांचा तडका दिलेला होता. अंग्रेजोंके जमानेके जेलर, सूरमा भूपाली आणि खबर्या केश्तो यांचं स्टिरिओटायिपंग शोलेमुळे झालं असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
अंदाज (१९७१) आणि सीता और गीता (१९७२) या सफल चित्रपटांच्या दिग्दर्शनाचा अनुभव गाठीशी असलेल्या रमेश सिप्पी यांचा शोले हा तिसरा चित्रपट. सर्जि लिओने यांनी त्यांच्या ‘वन्स अपाॅन अ टाईम इन द वेस्ट’ हा चित्रपट दिग्दर्शित करताना वापरलेल्या पध्दतींचा पगडा त्यावेळी २७-२८ वर्षे वयाच्या रमेश सिप्पींवर असावा असे वाटते. उदाहरणार्थ गब्बर सिंग लहान मुलाला गोळी मारताना होणारा आवाज रेल्वे इंजिनने टाकलेल्या सुस्कार्याशी क्रॅासफेडिंग करणे आणि ठाकूरच्या कुटुंबाच्या हत्याकांडाचा सिन काॅपी पेस्ट करणे. ७० एम. एम. पडदा, डॅाल्बी सराऊंड साऊंड मुळे टॅास केलेलं नाणं सिटखाली पडल्याचा भास होणे या नाविन्यपूर्ण टेक्नाॅलाॅजींचा वापर प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. त्याचबरोबर जयचं दोन्ही बाजूवर छापा असलेलं नाणं वापरुन स्व:त जोखीम पत्करण्याची त्याची वृत्ती प्रेक्षकांना भावली.
शोले ही हिंदी सिनेमाची युटोपियन कलाकृती ठरली. मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून पाहता प्रेक्षकांना हादरवून सोडणारा, सतत खुर्चीला खिळवून ठेवताना वेळोवेळी अनपेिक्षत धक्के देत खळखळून हसवणारा सिनेमा होता असं मला वाटतं. ‘अ’ कथानकाची सुरुवात का झाली याचा उलगडा मध्यांतरापूर्वी फ्लॅशबॅकने होतो. वडा-पाव चहा आणि पाॅपकाॅर्न खाताना ठाकूरला हातंच नाहीत या कथेतल्या जबरदस्त वळणाची कुजबुज ऐकू यायची. चित्रिकरण करताना हे रहस्य रहस्यंच राहिल याची काळजी घेताना दिग्दर्शकाला किती द्राविडी प्राणायाम करायला लागले असतील याची नुसती कल्पनाच केलेली बरी. याउलट मध्यांतर हा कंत्राटी पध्दतीने काम करत असलेल्या जय-वीरु दुक्कलीच्या ‘ब’ कथेचा मध्यबिंदू आहे. प्रेक्षकांप्रमाणेच जय आणि वीरुलाही ठाकूरची खरी कहाणी मध्यबिंदू आल्यावरच समजते आणि तिथून पुढची लढाई, दोघेही ग्लॅडिएटरच्या त्वेषाने, जिवाची बाजी लावून लढतात.
कोणताही रिसर्च न करता केवळ मनात आलं म्हणून सांगतो. कदाचित चुकीचंही असू शकेल. माल्कम ग्लॅडवेल यांचं टिपींग पाॅइंट हे पुस्तक शोलेच्या प्रदर्शनानंतर २५ वर्षांनी प्रकाशित झालं.
योग्यवेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य वातावरणात घडलेली एखादी गोष्ट अनाकलिनय कारणास्तव सकारात्मक अत्युच्च पातळीला किंवा नकारात्मक खालच्या पातळीला जाते त्यावेळी त्या घटनेबाबत हा टिपींग पाॅईंट येतो. हश पपीज या विस्मरणात गेलेल्या बूटांच्या मागणीत एकाएकी झालेली वाढ, न्यूयाॅर्क शहराच्या गुन्ह्यांमधे एकाएकी झालेली घट या अनाकलिनय गोष्टींची उदाहरणं देऊन टिपींग पाॅईंटची संकल्पना
मांडली आहे. शोलेच्या असामान्य यशाला टिपींग पाॅईँट लागू होईल का असा विचार मनात येतो. हे अथार्तच शोलेच्या टीमला त्याच्या यशाचं पूर्ण श्रेय न देण्यासारखं होईल म्हणा. पण असो.
जय आणि वीरु त्यावेळच्या तरुणांच्या वतीनं ठाकूरची अन्याया विरुध्दची लढाई लढले. प्रस्थापित राजवटीकडून लोकशाहीची मुस्कटदाबी चालू होती. लोकसंख्या नियंत्रणासाठी आतताय़ी योजना सुरु होत्या. समाजामध्ये व्यवस्थेविरुध्द बंड करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली होती. आपले कर्तव्य चोखपणे बजावलं असतानासुध्दा केवळ व्यवस्थेतील उणीवांमुळे मोठ्या हिकमतीने आणि शौर्य गाजवून पकडलेला डाकू
जामिनावर बाहेर काय येतो, कतर्व्यदक्ष पोलीस अधिकार्याच्या कुटुंबाची
हत्या काय करतो, निर्दयपणे लहान मुलांनाही सोडत नाही, ट्रॅपमध्ये ठाकूरला अलगद अडकवून त्याचे दोन्ही हात कलम करतो. हे सगळं चीड आणणारं आणि प्रेक्षकांच्या तळपायाची आग मस्तकात नेणारं होतं.
मला वाटतं की ठाकूरच्या वतीने जय-वीरु यांची लढाई ही प्रतिकात्मक होती. सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून दोन वर्षात आणिबाणी लागू झाली. आणिबाणी लागू होण्यापूर्वीच्या सेटअप दरम्यान हा सिनेमा प्रदर्शित झाला. जयचा या लढाईतील मृ्त्यु मनाला चटका लावून जाणारा होता. त्याचं जाणं म्हणजे त्याच्यावर मूक प्रेम करणार्या राधेची नियतीने पुन्हा केलेली क्रूर चेष्टा होती असंही प्रेक्षकांना वाटलं असावं. शोलेची चित्रपटगृहाबाहेर चर्चा सुरुचं राहिली. बर्याच लोकांनी तो अनेकवेळा पाहिला. त्यातल्या संवादांच्या तबकड्या गाण्यांच्या तबकड्यांसारख्या किंवा कदाचित त्यापेक्षा जास्त खपल्या.
पन्नास वषार्नंतरही शोलेची जादू कायम आहे. त्याच्या यशाची पुनरावृत्ती अजून पर्यंत दुसर्या कोणत्याही चित्रपटाला करता आली नाही. हिंदी चित्रपटसृष्टीच्या या कोहिनूरला लाख लाख सलाम.



