ऐतिहासिक शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी ठरणार आकर्षण
नाशिक/प्रतिनिधी:- शुभ घडीला शुभमुहूर्ति ज्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरिता अवघे शिवप्रेमी आतुर झाले आहेत तो नाशिक रोड मधील शिवजन्मोत्सवाचा सोहळा अगदी जवळ येऊन ठेपला आहे. नाशिक रोड परिसरात होणाऱ्या शिवजन्मोत्सव सोहळ्याची विविधता आणि वैशिष्ट्य याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात बोलले जाते इथल्या शिवप्रेमींनी शिवजन्मोत्सव सोहळ्यात अंगीकृत केलेला पायंडा सर्वांसाठीच आदर्श मानला जातो. सालाबादाप्रमाणे याही वर्षी नाशिक रोड शिवजन्मोत्सव समिती आपलं वेगळेपण अधोरेखित करण्यात कुठलीही कमतरता ठेवणार नसल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले आहे. यंदाच्या वेळेला सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचा देखावा साकारण्यात येणार आहे. या देखाव्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच पूर्ण होईल. शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सामाजिक, धार्मिक व लोकाभिमुख कार्यक्रमांची मेजवानीच शिवप्रेमींना दिली जाते. दि. 17 तारखेपासून विविध कार्यक्रमांना सुरुवात होईल यामध्ये दि. 17 सोमवार या दिवशी निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे कीर्तन होईल, 18 तारखेला रात्रीच्या वेळेला शिवजन्मोत्सव सोहळा या निमित्ताने झुलवा पाळणा तसेच महाआरती होणार आहे. 19 तारखेला शिवपूजन, अभिषेक, रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर या सोबतच 151 महिला आणि पुरुषांच्या शंभुनाद ढोल पथकाची मिरवणूक पार पडेल. मी मराठी गौरव महाराष्ट्राचा जागर लोककलेचा हा नंदेश उमप यांचा चित्रपट गीतांचा कार्यक्रम होईल. या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर, कार्याध्यक्ष सुनील सोनवणे, राहुल लवटे, विशाल सातभाई, प्रशांत कळमकर, गोकुळ नागरे यांनी दिली आहे.

